उमरखेड प्रतिनिधी – संजय वाघमारे 9302601023
उमरखेड (ता. २५ ऑक्टोबर):
पंचायत समिती व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने उमरखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भव्य भूमिपूजन सोहळा व कृषी मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले.या कार्यक्रमास राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष माननीय पाशा पटेल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या प्रसंगी पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना हवामानातील बदल,पावसाचे अनिश्चित प्रमाण,जमिनीतील कार्बन घट आणि आगामी २०५० पर्यंतची कृषी आव्हाने यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की,आज बांबू लागवड ही केवळ शेती नाही,तर ऊर्जा निर्मिती,रोजगारनिर्मिती आणि पर्यावरणसंवर्धन यांचा परिपूर्ण संगम आहे.एक मनुष्य वर्षभरात ३६५ दिवसांमध्ये सुमारे २८० किलो ऑक्सिजन वापरतो,तर एकच बांबूचे झाड वर्षभरात सुमारे ३०० किलो ऑक्सिजन निर्माण करते.त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी आणि तापमानातील वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बांबू लागवड अत्यंत आवश्यक आहे.
त्यांनी पुढे नमूद केले की आता ऋतूचक्र बदलले आहे;उन्हाळा उन्हाळ्यासारखा नाही, पावसाळा पावसाळ्यासारखा नाही,आणि हिवाळा हिवाळ्यासारखा नाही.या सगळ्याचे मूळ कारण म्हणजे जंगलतोड आणि वाढते प्रदूषण.बांबू लागवड हे या समस्यांवरचे प्रभावी उत्तर आहे.
बांबू लागवडीचे फायदे व आर्थिक संभाव्यता:
बांबू लागवडीचा खर्च अत्यल्प;निंदणी,खुरपणी किंवा कीडनाशकांचा मोठा खर्च नाही.जमिनीची सुपिकता वाढवतो,कार्बन साठवतो,आणि मृदासंवर्धन करतो.एकदाच लागवड केली की ५० वर्षांपर्यंत उत्पादन मिळते.बांबूपासून चष्मा,घड्याळ,सॉक्स,टूथब्रश,फर्निचर,कागद,बायोप्लास्टिक,व दैनंदिन वापराच्या वस्तू तयार होतात.
पाशा पटेल यांचे शेतकऱ्यांना आश्वासन:
येणाऱ्या आठ दिवसांत शासन स्तरावर बांबू पिकाचे दर निश्चित होणार असून,एकरी बांबूला ६ ते ७ लाख रुपयांपर्यंत भाव देण्याचा शासनाचा प्रस्ताव प्रगतीपथावर आहे,अशी ग्वाही मी आज देतो,असे पाशा पटेल यांनी ठाम शब्दांत सांगितले.
लागवडीचे तांत्रिक मार्गदर्शन:
जमिनीचा प्रकार: मध्यम ते भारी काळी जमीन योग्य.लागवड अंतर: ५x५ मीटर अंतरावर रोपे लावावीत.
बांबूच्या जाती:
बांबूसा बळकूआ – जाड खोड व जलद वाढणारी जात.
माणग बांबू (डेंड्रोकॅलमस स्ट्रिक्टस) – टिकाऊ व कडक बांबू,औद्योगिक वापरासाठी उपयुक्त.खत व पाणी व्यवस्थापन: सुरुवातीच्या काळात नियमित पाणी,नंतर सेंद्रिय खताचा वापर पुरेसा.
शासन योजना व लाभ:
या प्रसंगी अभयकुमार वडकुते (तालुका कृषी अधिकारी) यांनी बांबू लागवडीवरील शासनाच्या विशेष योजनेची सविस्तर माहिती दिली.शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी शासनाकडून प्रति एकरी आर्थिक अनुदान मिळते.या योजनेअंतर्गत रोपे,ठिबक सिंचन व्यवस्था,व तांत्रिक मार्गदर्शन मोफत दिले जाते.इच्छुक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयात अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा,असे वडकुते यांनी स्पष्ट केले.
उपस्थित मान्यवर
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार किसनराव वानखेडे होते.तर कृषी मार्गदर्शक पांडुरंगावर,माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर,विजय खडसे,माजी आमदार नामदेव ससाने,डॉ.विजय माने,डॉ.अंकुश देवसरकर,सभापती कृष्णा पाटील देवसरकर,चितंगराव कदम,भीमराव चंद्रवंशी,नितीन भुतडा,शिवाजी माने,सुदर्शन रावते,कृषी अधिकारी अभय वडकुते,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आडे व अन्य मान्यवर व मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव तसेच महिलावर्ग सुद्धा उपस्थित होते.
या मार्गदर्शन शिबिरात शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.पाशा पटेल यांच्या मार्गदर्शनातून बांबू हे केवळ पीक नसून भविष्याचा हरित ऊर्जास्त्रोत व शेतकऱ्यांच्या अर्थक्रांतीचे प्रतीक असल्याचा ठसा उमटल्याचे चित्र दिसून आले.





