मायाताई सागर पाईकराव
तालुका प्रतिनिधी महागांव
महागांव :
राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या सरकारकडून अजूनपर्यंत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे सततच्या नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ आणि उत्पादन खर्चातील वाढ यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे उबाठा महागांव येथे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, बाजारपेठेतील दर घसरले असून खर्च भागवणेही कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर बँक व सावकारांचे कर्ज वाढले असून अनेक शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर ढकलले गेले आहेत.
या स्थितीला आळा घालण्यासाठी सरसकट कर्जमुक्तीचाच एकमेव उपाय असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. सरकारने थकबाकीदार, चालू बाकीदार तसेच पीक कर्ज, सिंचन, उपकरणे, शेडनेट, पॉलीहाऊस, दुध उत्पादक शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे कर्ज माफ करावे, अशी मागणी करण्यात आली.
अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये थेट आर्थिक मदत द्यावी.
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीतून महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे.
पीक विम्याचे कठीण निकष शिथिल करून पंचनाम्याची प्रक्रिया टाळावी व विमा रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी.
अतिवृष्टीमुळे घर व पशुधनाचे नुकसान झालेल्यांना जुने निकष न लावता योग्य मोबदला त्वरित द्यावा. या आंदोलनात भिमरावभालेराव, प्रमोद (उर्फ शाखा) रामराव भरवाडे, रविंद्र विनास भारती, पाडुरंग नरवाडे, अंकुश बाबुलाल आहे, विलास साहेबराव फाडे, किरण किसनराव जामकर, रामदास काले, आशेक लहान मळाणे, देवराव सधाराम फाळे, सावन कीसन पवार, रातु सटवानी दोडेके, प्रविण दिपकरान भांगे, विशाल प्रकाश पांडे आदींचा सहभाग होता.
या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. प्रशासनाने आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले.






